नवी दिल्ली प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीत सध्या थंडीने कहर केला आहे. दिल्लीतील थंडीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. ढगाळ वातावरण असल्याने दिवसाचेही तापमान वाढत नाही. पुढील तीन दिवस थंडीचा प्रकोप कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिल्लीत आज पहाटे २.४ डिग्री सेल्सिअस इतक्या रेकॉर्ड ब्रेक किमान तापमानाची नोंद झाली. दिल्लीच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून आज पहाटे रेकॉर्डब्रेक २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत यंदा सलग १४ दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत असून आजतर थंडीने कहर केला आहे. काल शुक्रवारी दिल्लीत या मोसमातील सर्वाधिक थंडी होती. यावेळी सफदरजंग आणि पालम येथील किमान तापमान केवळ ४.२ डिग्री सेल्सिअस इतके होते. तर आया नगर येथील किमान तापमान ३.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर आज पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी शहरात २.४ डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली.