Home प्रशासन तहसील तालुक्यात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन शक्य ; शेतकऱ्यांनी ई-पिक...

तालुक्यात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन शक्य ; शेतकऱ्यांनी ई-पिक पेरणीची नोंद करावी – राकेश फेगडे


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात तसेच यावल तालुक्यात यंदा हरभरा पिकाच्या उत्पादनात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता असून, शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या हरभरा पिकांची सातबारा ई-पिक पेरणीद्वारे तात्काळ नोंदणी करावी, असे स्पष्ट आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

हवामानाची अनुकूलता, सुधारित बियाण्यांचा वापर आणि शेतकऱ्यांची वाढती जागरूकता यामुळे यंदा हरभरा पिकाचे उत्पादन विक्रमी पातळीवर जाण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, भविष्यातील शासकीय योजना, विमा लाभ, हमीभाव आणि अन्य शेतकरी हिताच्या सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी ई-पिक पेरणीची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित असल्याने त्यांनी वेळ न दवडता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, असेही फेगडे यांनी नमूद केले.

दरम्यान, कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या हमीभावाने सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. आज दिनांक ३० जानेवारीपर्यंत एकूण २२२१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तुलनेने भरडधान्य खरेदीला मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याचेही फेगडे यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मका उत्पादनासाठी १९९ शेतकऱ्यांनी तर ज्वारी उत्पादनासाठी ३९२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. आतापर्यंत १७६ शेतकरी बांधवांकडून १५00 क्विंटल ज्वारी व १२00 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. मात्र, या धान्य खरेदी प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे काही शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.

शनिवार व रविवारच्या सुट्या तसेच प्रशासकीय सुट्यांमधील गोंधळ यामुळे धान्य खरेदी प्रक्रियेत विलंब होत असल्याचे बोलले जात असून, या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तरीही शेतकऱ्यांनी संयम बाळगून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound