गणाक्षर कलावंत नेहा मालपुरे यांच्या विक्रमाची नोंद

भडगाव प्रतिनिधी । कुणाच्याही नावातून गणपती बाप्पा साकारणे म्हणजे गणाक्षर होय. भडगाव येथील कलाकार नेहा निलेश मालपूरे हिचे या कलेसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह इतर ५ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती म्हणजे गणपती. आज त्याच कलांपैकी एक कला म्हणजे गणाक्षर किंवा अक्षर गणेशा. आपल्या कुणाच्याही नावातून गणपती बाप्पा साकारणे म्हणजे गणाक्षर. ही आगळी वेगळी कला जोपासणारी भडगाव येथील कलाकार नेहा निलेश मालपूरे हिची या कलेसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ऑनलाइन वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद झाली आहे. 

 

विविध अक्षरी नावे, एकापेक्षा अनेक नावे तसेच कधी आडनाव तर कधी वेगवेगळ्या भाषातुन देखील नेहा गणपतीची कलाकृती साकारते. या कलाकृतीतुन आजवर अनेकांची नावे नेहाने गणपती बाप्पाच्या कलाकृतीत साकारलेली आहेत. तसेच अनेकांनी आपल्या प्रियजणांना वाढदिवस किंवा इतर शुभदिनी त्यांच्या नावाने साकारलेली गणपतीची कलाकृती भेट दिली आहे. या कलेच्या माध्यमातून विविध नावातुन गणपतीची विविध रुप बघायला मिळतात.

 

यावेळी नेहा मालपुरे यांनी लाईव्ह ट्रेड शी बोलताना सांगितले की, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मी ही कला जोपासत आहे. माझ्या कलेतुन आपल्या भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत गणेशाच साक्षात दर्शन होत आहे. आणि छंद फक्त जोपासून चालत नाही तर त्याच कलेत रुपांतर व्हाव लागत; तेव्हाच त्या कलेचा आस्वाद घ्यायला आपण शिकतो.

 

नेहाचे भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण झाले असुन, त्याच विषयात संशोधन करण्याचा तिचा मानस आहे. गेल्या वर्षी देखील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन सर्जनशीलता कार्यक्रमात नेहाने सहभाग नोंदवुन भडगावचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नेहा सामाजिक कार्यकर्ते तथा मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश मालपूरे व चित्रा मालपूरे यांची कन्या आहे.

Protected Content