जळगावात शासकीय होमीओपॅथी कॉलेजला मान्यता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे मेडिकल कॉलेज आणणारे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगाव येथे होमीओपॅथी कॉलेज मंजूर करण्यात आले असून हे राज्यातील पहिले शासकीय होमीओपॅथी कॉलेज आहे. या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना होमीओपॅथीच्या पदवीची सुविधा मिळणार आहे.

 

आ. गिरीश महाजन हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतांना त्यांच्यामुळे जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले होते. येथे आता नियमितपणे ऍडमिशन्स सुरू देखील करण्यात आल्या आहेत. यासोबत त्यांच्या प्रयत्नांनी चिंचोली शिवारात वैद्यकीय शाखांशी संबंधीत सर्व कॉलेजेस एकाच ठिकाणी उभारण्यासाठी मेडिकल हबला देखील परवानगी मिळाली होती. तथापी, सरकार बदलल्यामुळे मेडिकल हबच्या कामाला विराम लागलेला आहे.

 

दरम्यान, मेडिकल हबमधीलच होमीओपॅथी कॉलेज सुरू व्हावे यासाठी आ. गिरीश महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांच्याकडे त्यांनी या कॉलेजची मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश आले असून जळगाव येथे होमीओपॅथी कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. या संदर्भातील परिपत्रक आज जारी करण्यात आलेले आहे. यामुळे आता जळगाव येथे शासकीय होमीओपॅथी कॉलेज सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे राज्यातील पहिले शासकीय होमीओपॅथी कॉलेज आहे. येथे पहिल्या टप्प्यात पदवीसाठी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे याच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगाव येथील मेडिकल होममध्ये आधीच एम बी बी एस आणि बी ए एम एस हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. या पाठोपाठ आता होमिओपॅथीचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू होणार असल्याने जळगावच्या शिरपेच यामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार गिरीश महाजन यांनी जळगाव येथील मेडिकलमध्ये सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम आणि सुविधा एकाच छताखाली आणण्याचा निर्धार केलेला असून होमिओपॅथी कॉलेजला मिळालेली मान्यता ही या दिशेने टाकले गेले दमदार पाऊल मानले जात आहे.

 

या संदर्भात आ. गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पायाभूत वैद्यकीय सुविधांसाठी आपण स्वत: मंत्री असतांना प्रयत्न केले असले तरी या सरकारने याच्या पुढे कोणतेही काम केलेले नाही. तथापि, आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून होमीओपॅथी कॉलेज मंजूर करून आणले असून याच्या मुळे स्थानिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून आपण  मेडिकल हबच्या उर्वरित कामांना देखील गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content