किरकोळ कारणावरून तरूणाच्या डोक्यात टाकली फरशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पांडे डेअरी चौकात किरकोळ कारणावरून तुकाराम वाडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरूणाच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर दुखात केल्याची घटना गुरूवारी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. मारेकरी हा फरार झाला असून जखमीस जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. संदीप दत्तात्रय वाणी (वय-३०) रा. तुकाराम वाडी, जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप वाणी हा जळगाव शहरातील तुकाराम वाडी येथे वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पांडे डेअरी येथे कामाच्या निमित्ताने आलेला होता. या ठिकाणी एका अनोळखी तरूणासोबत वाद झाला. यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात संतापाच्या भरात अनोळखी तरूणाने रस्त्यावर पडलेली फरशी संदीपच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. मारेकरी हा घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, जखमीवस्थेत पडलेल्या संदीपला त्याच्या ओळखीच्या काहीजणांनी त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेवून जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेबाबत अद्यापपर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content