जलयुक्त शिवार अभियानात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील गावांचा समावेश करा – आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील गावांचा समावेश करावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गावांची निवड करणेसाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांची सदरील समितीचे जिल्हास्तरीय अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात असून त्याचे मार्फत जिल्ह्यातील एकूण २४५ गावांच्या निवडीसाठी मजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रकर्षाने मुक्ताईनगर तालुका अवर्षणप्रवण तालुका आहे तसेच बोदवड तालुका हा १०० टक्के अवर्षणप्रवण तालुका आहे. त्यामुळे यातील संपूर्ण गावे समाविष्ट करणे गरजेचे असताना मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने या परिसरात गुरांना पिण्याचे पाणी कमी आहे. तसेच नागरिकांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदरील जलयुक्त शिवार अभियान २.० हि योजना या भागात राबविणे गरजेचे असताना बोदवड तालुक्यातील केवळ एक गाव निवड यादीत दिसून येत आहे तर मुक्ताईनगर तालुक्याच्या पटलावरच अस्तित्वात नसलेले दौलतपुर गाव निवड यादीत दिसून येत असल्याने अशी अक्षम्य चूक या यादीत मुक्ताईनगर व बोदवड बाबतीत समितीमार्फत झालेली दिसून येत आहे. त्यामुळे या भागात खऱ्या अर्थाने योजना करणे गरजेचे असताना समितीच्या लक्षात वरील गंभीर बाबी न आल्यामुळे भविष्यात मुक्ताईनगर मतदार संघातील दोन्ही तालुके अवर्षणप्रवण राहून या भागात पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष निर्माण होईल. त्यामुळे यासंदर्भात पुर्नआढावा घेवून जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये या मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील गावे समाविष्ट करावीत तसेच झालेली चूक तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशा मागणी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी , जळगाव व विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचेशी भ्रमण ध्वनी वरून चर्चा करून लेखी पत्राद्वारे केली आहे.

Protected Content