भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरचे अनेक इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसू लागतील यात कुणाचेही दुमत असणार नाही. तथापि, त्यांच्या पक्षत्यागामुळे भाजपसमोर खूप मोठे आव्हान हे कशा प्रकारे उभे राहणार आहे याबाबतचे अभ्यासपूर्ण विवेचन लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी केले आहे.
मंजिल से जरा कह दो, अभी पहुंचा नहीं हूं मै
मुश्किले जरूर है, मगर ठहरा नही हूं मै…!
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतरा नंतरचं कवित्व अद्याप ही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात पक्षांतराच्या घटना गेल्या २५ वर्षात अनेक घडल्याचे आपण बघितल्यात. ही काही एकमेव घटना अथवा नवीन नाही. लहान, मोठ्या नेत्यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या, मात्र एवढ्या दीर्घकाळ एखाद्या बद्दलची चर्चा निरंतर सुरू असल्याचे हे एकमेव, उदाहरण म्हणता येईल. श्री.खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी पक्षात पदार्पण केल्यानंतर खर तर हा विषय चर्चेचा रहात नाही. पण या पक्षांतरा संदर्भात त्यांच्या राजकीय प्रभावाच्या अंगाने मत प्रदर्शनं केले जात आहे, यात सर्वात जास्त आघाडी भाजपने घेतल्याचे आपण अनुभवत आहोत.त्यांच्या पक्षांतरानंतर कुणी म्हणाले. ”भगदाड तर सोडा साधं छिद्र ही पडणार नाही !” कुणी म्हणाले ”भाजपचा एक ही कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही, काहीही फरक पडणार नाही.” तर दुसरीकडे भाजपच्या पक्ष संघटकांनी लगेच ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या निष्ठेची चाचपणी सुरू केली. ही स्थिती पाहता भाजप च्या वरिष्ठ नेत्यांना भाजप मध्ये एकनाथराव खडसे असणे आणि नसण्याचा काय परिणाम होऊ शकतो याची कल्पना आली असावी.
खडसेंचे बलस्थान…
एकनाथराव खडसे यांनी सातत्याने तीस वर्षे भाजपचे प्रतिनिधित्व केले. पक्षाचे ते खान्देश विभागात एकमेव निरंकुश नेता होते. खानदेश मधील लोकसभा, विधानसभेचे उमेदवार तेच निश्चित करीत होते, खानदेश मध्ये तेच निर्णायक होते. हा सन्मान त्यांना भाजपने जरूर दिला, मात्र त्या मागे समाजशक्ती (केवळ लेवा समाज नव्हे, तर तमाम ओबीसी, दलित व अल्प संख्यांक ! ) भक्कमपणे उभी असायची म्हणून भाजपला ही त्यांच्या शिवाय पर्याय नव्हता. प्रत्येक समाज घटकांशी असलेली घट्ट नाळ हे त्यांचे बलस्थान ! म्हणुन त्यांना आव्हान देने इतर पक्षांसाठी सहज सोपे नव्हते. त्यांनी राजकीय भूमिका बदलली असली तरी त्यांची बलस्थाने त्याच्याकडून हिरावून घेण्याच्या योग्यतेचा नेता जिल्ह्यात कोण आहे ? सत्ता सदा सर्व काळ कुणाची असू शकत नाही हे जरी खरे असले तरी एखाद्या नेत्याने दीर्घ काळाच्या कारकिर्दीतून निर्माण केलेला सामाजिक प्रभाव भूमिका बदलली म्हणून लगेचच बदलत नसतो. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात, गावागावात त्यांनी व्यक्ती आणि राजकीय नेता म्हणून निर्माण केलेले संबंध सत्ता किंवा पदा पलिकडचे असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.
श्री.खडसेंच्या पक्षांतरामुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडसेंची बदललेली भुमिका ही सामाजिक दृष्ट्या उत्सुकतेची ठरू शकते, कारण समाजघटकांना खडसेंची भूमिका आवडली नसती, तर निश्चितच पणे प्रतिक्रिया समाजमनातून उमटल्या असत्या. परंतु अद्यापही काही प्रतिक्रिया नाहीत. एखनाथराव खडसे जरी भाजपच्या चिन्हावर मोठे झालेले असले तरी समाज शक्ती ही तितकीच महत्वाची आहे. आपल्या अभ्यासपूर्ण बेधडक, बेमूर्वत शैली मुळे राज्याच्या विधिमंडळात त्यांनी स्वतः ची ओळख निर्माण केली, ही वैशिष्ठे विचारात घेऊनच महाराष्ट्रा च्या राजकारणातील महानायक शरद पवार यांनी त्यांचे सहर्षपूर्वक राष्ट्रवादीत स्वागत केले. जळगाव अथवा खानदेशच्या राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाचा विचार केल्यास श्री खडसें व्यतिरिक्त लोकमान्य नेता म्हणून अन्य कुणी दृष्टीपथात नाही. त्यामुळे त्यांचे पक्षांतर जिल्ह्याच्या दृष्टीने ‘गेम चेंजर’ ठरू शकेल.
जाता….जाता…
खडसेंनी भाजपचा त्याग केल्या नंतर भगदाड तर दूर साध छिद्र ही पडणार नाही,असे ज्यांनी म्हटलं, त्यांना छिद्र आणि भगदाड मधला फरक कदाचित माहित नसावा. एक वेळ भगदाड परवडले, पण छिद्र नाही कारण एक सूक्ष्म छिद्र अवाढव्य जहाज बुडविण्यास पुरेसं असतं……!
सुरेश उज्जैनवाल
सल्लागार संपादक – लाईव्ह ट्रेंडस न्यूज
संपर्क – 88888 89014