टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची फेरनिवड

ravi shastri

 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी शास्त्री यांच्या नावाची आज घोषणा केली. विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून शास्त्री जाणार की राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

 

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर संघासोबत रवी शास्त्री यांच्यावरही जोरदार टीका झाली होती. त्यामुळे त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी निवड होईल की नाही? याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण आज अखेर रवी शास्त्री यांचे नाव जाहीर झाल्यानंतर या चर्चेवर पडदा पडला आहे. २०२१ मध्ये भारतात होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम असतील. दरम्यान, या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स या सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. कॅप्टन विराट कोहलीनेही आपले वजन शास्त्रींच्या तराजूत टाकले होते. त्यामुळे कोहलीची ईच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.

Protected Content