रावेर प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोडवरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून ३० हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार अक्षय भरतलाल जयस्वाल (वय-३१) रा. भागीरथी नगर, अकोला ह.मु. रेल्वे स्टेशनरोड रावेर हे युनियन बँकेत नोकरीला आहे. १३ नोव्हेंबर दुपारी ३ ते १५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटातून ३० हजार रुपयांची रोकड लांबविले. याप्रकरणी अक्षय जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.