राज्य सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी आरक्षण गेले : पंकजा मुंडे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले असल्याचा आरोप करत आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, इम्पिरिकल डेटा देण्यासाठी मागणी होत असताना १५ महिन्यात ७ वेळा तारखा घेण्यात आल्या. वेळकाढूपणा करण्यात आला. या सरकारने ओबीसींच्या पाठित खंजीर खुपसलं आहे. निवडणुकीच्या अध्यादेशासाठी इम्पिरीकल डेटा महत्त्वाचा आहे. मात्र, हा अध्यादेश हा केवळ दिखाऊपणा आहे. आता अधिवेशन येत आहे. त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कालावधी ठरवून घेतला पाहिजे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली. या कामगारांच्या मदतीला कोणीही गेलं नाही. आमदार आणि खासदारांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही असा आरोप त्यांनी केला.

Protected Content