…तर राज्यभर औषध फवारणीचे धोरण राबवा : राजीव पाटलांचा खोचक सल्ला !

रावेर प्रतिनिधी | ”घराला वाळवी लागली तर औषध फवारावेच लागते”, या आमदार शिरीष चौधरी यांच्या वक्तव्यावरून राजीव पाटील यांनी पलटवार करत ”आमदारांनी राज्यभर औषध फवारणीचे धोरण राबवावे” असा खोचक सल्ला दिला आहे.

रावेर विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांच्या पराभवाचे कवित्व संपण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. या मतदार संघातून धक्कादायक खेळीतून जनाबाई महाजन यांनी माजी आमदार अरुण पाटील यांचा एका मताने पराभव केला. त्यांचा अनपेक्षित विजय झाल्यावर आता आरोप प्रत्यारोपांची श्रुंखला सुरू झाली आहे. या विजयावर आमदार शिरीष चौधरी यांनी देखील राजीव पाटील यांचा नामोल्लेख टाळून घरात वाळवी लागली तर औषध फवारावे लागते, असा टोला लगावला होता. यासंदर्भात माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पलटवार केला आहे.

यात म्हटले आहे की, गोंडू महाजन यांनी निकालानंतर आमच्यावर टीका केली आहे. त्यांच्याऐवजी ही प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा आमदारांनी दिली असती तर अधिक योग्य खुलासा दिला असता. भलत्याच लोकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देवून मला चिखलात दगड मारायचा नाही. विश्वासघातकी कोण आहे? हे जनतेला समजते असे यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, याच पत्रकार राजीव पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांना देखील टार्गेट केले आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी निकालानंतर केलेल्या टिप्पणीत पक्षविरोधी काम करणार्‍यांना लक्ष करत घरात वाळवी लागली तर औषध फवारावे लागते, असे म्हटले होते. यावर राजीव पाटील म्हणाले की, त्यांच्या बोलण्याचा रोख व्यक्तिगत अथवा माझ्यासाठी असेल तर अभ्यास करून उत्तर देऊ. चौधरी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी हे धोरण जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी राबवावे. आपण त्याचे स्वागतच करू, असे राजीव पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content