मोठ्या आवाज करणाऱ्या बॅण्ड पथकावर पोलीसांची कारवाई; गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोकरी येथे एका मिरवणुकीदरम्यान परवानगीपेक्षा अधिक मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या श्री म्युझिकल बॅण्डवर रावेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही चौथी कारवाई असून, जिल्हास्तरावर ध्वनी प्रदूषणाविरोधात झालेली ही पहिली अधिकृत कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आयोजकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

घडलेल्या घटनेनुसार, २० एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेसात वाजता भोकरी गावात एका मिरवणुकीत श्री म्युझिकल बॅण्ड मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्याधुनिक db(A) लेग ध्वनी मोजणी यंत्राच्या साहाय्याने आवाजाची तीव्रता मोजली. तपासणीत शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा आवाज खूप जास्त असल्याचे स्पष्ट झाले.

या गंभीर ध्वनिप्रदूषणाच्या उल्लंघनामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी आयशर वाहन (MH12 NX 4560) चा चालक अजय संजय बोरसे (रा. शिरुड, ता. अंमळनेर) याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी प्राधिकृत ध्वनी मापन विभाग, जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. रावेर पोलिसांनी या संदर्भात स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे की, जिल्ह्यातील सर्व बॅण्ड मालक आणि मिरवणूक आयोजकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच वाद्ये वाजवावीत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन सपकाळे यांच्या पथकाने केली.

Protected Content