रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेहता येथे एकाने आपल्या पत्नीचा खून करून स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोझोदा येथेल डबल मर्डरनंतर काही दिवसांनीच तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, नेहता येथील फकिरा तुकाराम वैदकर या व्यक्तीने आपली पत्नी कमलाबाई वैदकर यांची विळ्याने वार करून हत्या करून नंतर स्वत: गळफास घेतल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
फकीरा वैदकर (वय ७३) हे भांडकुदळ स्वभावाचे असल्याने ते आपली पत्नी कमलाबाई (वय ६७) हिच्यासोबत मुलांपासून वेगळे राहत होते. आज पहाटे त्यांची नात हर्षाली ही घरी दूध घेऊन आली असताना तिला आपले आजी व आजोबा मृत अवस्थेत दिसून आले. तिने आरडा-ओरडा करून शेजारच्यांना याची माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
प्रथमदर्शनी फकीरा वैदकर यांनी पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण विळ्याने वार करून तिला ठार मारल्याचे दिसून आले आहे. त्यांना विजेचा धक्का लागल्याचेही दिसून आले आहे. तर आपल्या पत्नीला ठार केल्यानंतर फकीरा यांनी शेजारच्या खोलीत जाऊन गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.