जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोईवाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या घरातून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भरत सुभाष पवार (वय-२८, रा.भोईवाडा जळगाव) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान त्याचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याचा चपलाहार, कानातले टोंगल तसेच सोन्याची मणी असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवार २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. ही घटना घडल्यानंतर भरत पवार यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.