खासदार संभाजी महाराजांनी मोदींना भेटून मार्ग काढावा

अहमदनगर: वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रोखठोक भूमिका मांडत प्रसंगी राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखविला होता .आता या प्रश्नापुढे आपण पक्ष किंवा पद याला महत्व न देता समाजासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या खासदारांनी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेतली. संभाजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंबंधी मार्ग काढावा, अशी विनंती या खासदारांनी केली.

नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने दिल्लीत खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. भारती पवार, खासदार डॉ. हीना गावित, खासदार उन्मेष पाटील यांनी ही चर्चा केली . आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत.

खासदार डॉ. विखे यांनी सांगितले की, ‘मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने त्यावर लवकर आणि योग्य तोडगा निघणे अपेक्षित आहेत. संभाजी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली तर काही सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास वाटतो. त्यामुळे आम्ही ही भेट घेतली. संभाजी महाराजांनीही यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.’ वाद कोर्टात असला तरी भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत यावर काही तरी तोडगा निघावा, अशी या खासदारांची अपेक्षा आहे.

Protected Content