रावेर जि. प. जलसंधारण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दाखल ; चर्चेला उधाण

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर जिल्हा परिषद जलसंधारण विभागात अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दाखल झाले असून तब्बल चार तास चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, या माहितीने एकच खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यात सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत १ ९ गावांमध्ये या योजनेंतर्गत ४१७ कामांवर साडे तेरा कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही भूजल पातळी वाढली नाही. तर ज्या गावांमध्ये ही कामे करण्यात आली असून तेथील पाणी टंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. ही कामे निकृष्ट झाल्याची नागरिकांमध्ये ओरड असल्याची तक्रार होती.

या संदर्भात वेळो-वेळी लाईव्ह ट्रेंडस न्यूज ने आवाज उचला होता. याची दखल आमदार शिरीष चौधरी यांनी घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत एसआयटीद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी जळगावच्या अँटी करप्शन पथकाने येथील लघु सिंचन विभागाची सुमारे चार तास झाडाझडती घेतली आहे. सहा ते सात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुपारी तीन वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत या कार्यालयातील कुसुंबा येथील साठवण बंधाऱ्याच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली. दरम्यान या संदर्भात जलसंधारण विभागाचे उप विभागीय अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले की जलयुक्त शिवार व साठवण बंधारे संदर्भात झालेल्या कामांची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.

या विभागाने केली “जलयुक्त” शिवारची कामे

या योजनेंतर्गत तालुक्यातील १९ गावात नाला खोलीकरण व बांध, सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, साठवणी बंधारा, पाझर तलाव, शेततळे, मातीचे बंधारे अशी कामे करण्यात आली आहेत. कामे झालेल्या गावांपैकी बहुतांशी गावे आदिवासी भागातील आहेत. ही कामे तालुका कृषी कार्यालय, रावेर वन विभाग(प्रादेशिक), पाल वन्यजीव विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघु सिंचन विभागाने केलेली आहेत.

 

Protected Content