मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचा समारोप

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथा  समारोप प्रसंगी केले. प्रसंगी श्रीमद् भागवत ग्रंथाची दिंडी भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली. तसेच काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला.

 

मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर चौकांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कथा संगीतमय भागवत कथेचे दि. १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते.  सप्ताहाचे बावीसवे वर्ष होते.

 

मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी सप्ताहाचा समारोप झाला. सकाळी संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा समारोप प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी भाविकांना प्रबोधित करीत भागवत कथेचा अखेरचा अध्याय समजावून सांगितला. भागवत कथेतून जीवनाचे सार कसे मिळतात ते स्पष्ट करून दिले. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही.

 

भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. प्रसंगी उपआयुक्त प्रशांत पाटील, नागपूर येथील वित्त व लेखा अधिकारी कपिल पवार, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, आशुतोष पाटील, उमेश सोनवणे, लेखाधिकारी अभिजित बाविस्कर, मनपा अधिकारी वानखेडे, मेहरुण प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

 

दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर चार वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी भाविकांच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. महिला भाविकांनी मंगलकलश घेऊन लक्ष वेधून घेतले होते तर लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. दिंडी मेहरुण परिसरामध्ये काढण्यात आली.  ठिकठिकाणी दिंडीचे फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत करण्यात आले.

 

दिंडीत भगवंतांच्या नावाचा जयघोष करीत भाविकांनी टाळ मृदुन्गाच्या निनादात मेहरुण परिसर दुमदुमून टाकला. संत ज्ञानेश्वर चौकात दिंडीचा समारोप झाला. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर या सप्ताहाचा व कथा सोहळ्याचा समारोप झाला.

 

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, श्री स्वामी विवेकानंद मंडळ, साईदत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना तसेच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी आणि मेहरुण ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content