रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील एका प्रतिष्ठित धनदांडग्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. आता या प्रकरणात आरोपी महिला आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
रावेर शहरातील एक प्रतिष्ठित धनदांडगा २०१८ मध्ये स्वतःच्या कारने जळगावला जात असताना, लोणी (ता. चोपडा) येथील ४३ वर्षीय महिलेला लिफ्ट दिली. या प्रवासादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर, महिलेने त्या व्यक्तीला जेवणासाठी बोलवले व कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर, त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ चित्रित केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ती वारंवार खंडणी मागू लागली.
२३ डिसेंबर २०२३ पासून या महिलेने आणि तिच्या मुलगा निर्मल पाटील (वय २१) यांनी फोन पेद्वारे सुमारे ११ लाख रुपये घेतले. यानंतर पैशांची मागणी वाढत गेली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलेने फिर्यादीकडून ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा करून घेतला. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित व्यक्तीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी महिलेवर लक्ष ठेवून तिला रंगेहात अटक केली. आज, तिच्या मुलालाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे हनीट्रॅप प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून, नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक पुढारी या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे दिसून येत आहे. रावेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.