‘त्या’ पिता-पुत्रावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रावेर प्रतिनिधी | फैजपूर येथे वास्तव्यास असणारे नीलेश बखाल आणि त्यांचा पुत्र आर्यन यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचे मूळ गाव असणार्‍या विवरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

फैजपूर येथील आराधना कॉलनीच वास्तव्यास असणारे नीलेश बखाल यांनी काल आपल्या सहा वर्षाच्या मुलासह स्वत:ला फासावर लटकावले होते. ते मूळचे रावेर तालुक्यातील विवरे येथील रहिवासी आहे. गेल्या चार वर्षांपासून ते फैजपूर शहरातील आराधना कॉलनीत रहिवासाला होते. काल सकाळी नीलेश कुटुंबासह शहरात किराणा खरेदीला गेले होते. पत्नी राणी हिला बाजारात सोडून ते मुलगा आर्यनला सोबत घेत ११.३० वाजेच्या सुमारास घरी परतले. नंतर अर्धा तासाने बाजारातील खरेदी आटोपून त्यांची पत्नी राणी बखाल घरी परतली. या वेळी घरातील दरवाजा आतून बंद होता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने इतरांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर नीलेश व आर्यन हे दोघे नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन मृतावस्थेत आढळले. यामुळे परिसरात घर मालक ललित विलास जावळे यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आलेले एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, हवालदार देविदास सुरदास, अनिल पाटील, उमेश चौधरी, गुलबक्ष तडवी, महेंद्र महाजन यांनी पंचनामा केला.

पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मृतदेहाचे यावल येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर सायंकाळी उशीरा विवरे येथे पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी परिसरावर शोककळा पसरली होती. विशेष बाब म्हणजे आत्मघात करण्याच्या सुमारे एक तास आधी निलेश बखाल हे आपल्या आपल्या वडलांशी मोबाईलवरून बोलले होते. आपण आनंदात असून पुढच्या आठवड्यात विवर्‍याला येतो, असे नीलेश वडिलांशी भ्रमणध्वनीवरून बोलला. त्यानंतर तासाभरातच मुलगा अन् नातवाच्या मृत्यूची बातमी विवर्‍यात धडकल्याने वडील घनश्याम बखाल यांना जबर धक्का बसला. तर त्यांच्या आप्तांच्या आक्रोशाने समाजमन हेलावले.

Protected Content