नवी दिल्ली-वृत्तसंस्था | इंधन दरामुळे देशभर प्रक्षोभ उसळला असतांना आज केंद्र सरकारने अबकारी दरात कपातीचा निर्णय घेतला असून यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलचा दर ९.५० पैसे आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे. करोनाचं संकट, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध यामुळं निर्माण झालेली स्थिती, महागाईचा फटका यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं कर कमी केले आहेत. यामुळं केंद्र सरकारला ६ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नव्हते.
निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, केंद्राने पेट्रोलवर 8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील 6 रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. एकामागून एक केलेल्या १२ ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादनांवरील अबकारी, कस्टम, आयात आणि निर्यात शुल्क कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. “आमची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थांवर सीमाशुल्क देखील कमी करत आहोत. यामुळे अंतिम उत्पादनांची किंमत कमी होईल. त्याचप्रमाणे आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थ यांच्या किंमती कमी करण्यासाठी लोखंड आणि पोलाद यांच्यावरील सीमाशुल्क कमी करत आहोत. काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल. मात्र, काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे,” असे सीतारमण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून विरोधकांनी टीका केली असतांना आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.