ऊसतोड कामगारांच्या मदतीसाठी ‘बॅटरीवर चालणारा कोयता’ आणणार – धनंजय मुंडे

सोलापूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ऊस तोड कामगारांचे श्रम आणि वेळेची बचत व्हावी यासाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ‘बॅटरीवर चालणारा कोयता’ अस्तित्वात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दक्षिण सोलापूर येथे गोकुळ शुगर्स साखर कारखान्याच्या ‘गळीत हंगाम’ समारोप प्रसंगी कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलतांना, “कुठलाही ऋत्रू, हवामान आणि वातावरणाची तमा न बाळगता काम ऊसतोड बांधव ऊस तोडणीचे अपार कष्टाने करत असतात. त्यांच्या श्रमासह वेळेची बचत व्हावी आणि  कमी वेळेत अधिक ऊस तोडल्याने त्यांना अधिक मोबदला मिळावा या अनुषंगाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारा कोयता अस्तित्वात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.” असे सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी सांगितले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी या वर्षी मराठवाड्यातील ऊस मोठ्या प्रमाणात आणून गाळप केल्याबद्दल सर्व कारखान्यांचे आभार मानत साखर कारखाना हंगामाच्या समारोपास आपण प्रथमच शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी मराठवाड्यातून ऊस आणला, आता ज्या कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत, त्यांनी त्यांच्याकडे असलेले हार्वेस्टर व अन्य यंत्रणा मराठवाड्यातील कारखान्याकडे पाठवाव्यात, असे आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.

राज्य सरकारने कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, अतिवृष्टी मध्ये मदत असे वेळोवेळी शेतकऱ्याला संकट काळात सावरले असल्याचे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारच्या महागाई बाबतच्या निष्क्रियतेवरही टीका केली. केंद्रातील सरकार व त्यांचा पक्ष महागाई वरून सर्व सामान्य माणसाचे लक्ष विचलित व्हावे व त्यांचे सरकार नसलेल्या राज्यातील सरकार अस्थिर व्हावे या उद्देशाने जाणीवपूर्वक धार्मिक विषयातून वादंग निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. संजय मामा शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे, लोकेनेते शुगर्सचे चेअरमन बाळराजे पाटील, गोकुळ शुगर्स चे चेअरमन दत्ता शिंदे, संतोष पवार आदींची उपस्थिती होती.

Protected Content