महिलेवर पाळत प्रकरण : संजय राऊत यांनी फेटाळले आरोप !

मुंबई प्रतिनिधी । खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केल्याच्या प्रकरणात राऊत यांनी न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने संजय राऊत यांच्यावर धक्कादायक आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संबंधीत महिलेने छळवणूक, पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांप्रकरणी तीन वेळा तक्रार केली आहे. तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पहिल्या गुन्ह्यत आरोपपत्र दाखल झाले आहे, दुसर्‍या प्रकरणात पोलिसांनी पुरावे नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. मात्र यातील एकाही प्रकरणात राऊत यांच्या नावाचा समावेश नाही.

या प्रकरणी काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. यात संजय राऊत यांच्या वतीने युक्तीवाद करणारे अ‍ॅड. प्रसाद ढाकेफाळकर यांनी ही महिला संजय राऊत यांच्या मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. पतीसोबत तिचा वाद सुरू आहे. या प्रकरणात राऊत तिच्या पतीची बाजू घेत असल्याच्या समजातून ती त्यांच्यावर हे आरोप करत आहे, असा दावा केला. तर, मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असे सांगत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

न्यायमूर्तींनी या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यास नकार दिला. मात्र आपण या महिलेचे म्हणणे ऐकणार आहोत, असे स्पष्ट करत तिला पहिल्या गुन्ह्यत दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत उपलब्ध करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

Protected Content