राणा दाम्पत्याला अद्याप दिलासा नाही?

जामीनाचा निकाल होणार बुधवारी

 मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  प्रक्षोभक वक्तव्य तसेच  सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राणा दाम्पत्याच्या  जामीन अर्जावरील  निकाल आज देण्यात येणार होता. तो आज देखील तसाच राहिला असून या जामीन अर्जावर न्यायालयाकडून आता बुधवारी निकाल देण्यात येणार आहे, त्यामुळे राणा दाम्पत्याला अद्याप दिलासा मिळालेला नाही.

अमरावतीचे लोकप्रतिनिधी असलेल्या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठन करण्याची आग्रही भूमिका घेत समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शासन व्यवस्था कोलमडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा या उद्देशाने राणा यांनी कृत्य केले होते, त्या अर्थाने हा राजद्रोह होतो, तसेच राज्य सरकारला आव्हान दिले, यामुळे लोकप्रतिनिधी असलेल्या राणा दाम्पत्यांविरोधात १२४ अ राजद्रोह अंतर्गत कलम लावले, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी शनिवारी झालेल्या सुनावणीत मांडले होते. त्यावर

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी होऊन जामिनाबाबतचा निर्णय त्यांनी राखून ठेवण्यात आला होता व आज सोमवारी पाच वाजता राणा दाम्पत्याला निर्णय देण्यात येणार होता.

परंतु, आज देखील निकाल पूर्ण झाला नसल्याने निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यातच मंगळवारी रमजान ईद आणि अक्षय तृतीय सणामुळे कोर्टाला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य आणि राजद्रोह केस संबंधित निकाल बुधवारी सकाळी अकरा वाजता सुनावला जाणार आहे.

न्यायालयाकडे  महत्त्वाची केस असल्याने आज निकाल होऊ शकला नाही. मात्र बुधवारी याप्रकरणी कोणताही युक्तीवाद केला जाणार नसून थेट निकाल सुनावला जाणार असल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे एकूणच खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असली तरी, राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नसून बुधवारपर्यंत तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!