मुंबई (वृत्तसंस्था) पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना योगगुरु रामदेव बाबांनी वैचारिक दहशतवादी म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला बाबा कोण म्हणते मला माहित नाही. त्याची अक्कल गुडघ्यामध्ये आहे. एवढेच नव्हे तर, रामदेव बाबांनी माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
योगगुरु रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी म्हटले होते. या वादावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही भाष्य केले असून त्यांनी रामदेव बाबांना इशाराच दिला आहे. आव्हाडांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “जातीनिर्मूलनाचे काम करणारे डॉ. आंबेडकर आणि पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांना रामदेवबाबा वैचारिक दहशदवादी म्हणतो हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, रामदेव बाबाने लवकरात लवकर माफी मागितली नाही तर त्याला महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार,” असे म्हटले आहे. तसेच व्हिडिओमध्येही त्यांनी रामदेव बाबांचा एकेरी उल्लेख केला आहे. “त्याला बाबा कोण म्हणतं मला माहित नाही. त्याची अक्कल गुडघ्यामध्ये आहे. रामदेव कुठल्या विचारांनी घडलाय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. तुम्हा आम्हाला सुरक्षित ठेवणारे संविधान आंबेडकरांनीच आणले. पेरियार आणि आंबेडकर जातीव्यवस्थेविरोधात लढले. त्यामुळे रामदेव बाबाने शहाणपणा दाखवून माफी मागितलेली बरी, असे आव्हाड या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.