अकोला – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे त्यामुळं विजेचा तुटवडा निर्माण होऊन भारनियमनचा निर्णय घेण्याची गरज पडू शकते,’ असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. राऊत पुढे म्हणाले, कोरोना मुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे, आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
तसंच, ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अश्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही मुर्वत दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.