तेहरान वृत्तसंस्था । रशियात शांघाई कॉर्पोरेशन बैठकीत सहभागी झाल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अचानक तेहरानमध्ये दाखल झाले. चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या इराण दौऱ्याला महत्त्व आले आहे. तेहरानमध्ये राजनाथ सिंह यांची इराणच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्या प्रत्युत्तरात भारत इराणच्या चाबहार बंदराचा विकास करत आहे. या बंदरामुळे भारताचे सामरीकच नव्हे तर आर्थिक हितही साधले जाणार आहे. चीनसोबत वाढता तणाव आणि रिंग ऑफ पर्ल्सच्याविरोधात या बंदराची भूमिका निर्णायक आहे. चाबहार बंदराच्या विकासाच्या मंदावलेल्या गतीमुळे इराण चिंतेत आहे. त्यामुळे या बैठकीत इराणची चिंता दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तान आणि चीन एकत्र येत ग्वादर बंदराला भारताविरोधात आर्थिक आणि सामरीकदृष्ट्या वापरणार आहे. त्यामुळे इराणच्या चाबहार बंदराचे महत्त्व खूप आहे. त्याशिवाय चाबहार बंदरामुळे पाकिस्तानच्या ग्वादर बंदरालाही फटका बसला आहे. मध्य आशियातील अनेक देश हे पाकिस्तानच्या ग्वादर बंदराऐवजी इराणच्या चाबहार बंदराचा वापर करत आहेत.
चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. चीनने इराणसोबत अब्जावधींचा करार केला होता. त्यामध्ये संरक्षण, व्यापार आदीसह इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली होती. इराणला आपल्या बाजूने पुन्हा वळवून चीनला धोबीपछाड देण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
इराण आणि पाकिस्तानमधील संबंध आधीच चांगले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी इराणला भारताची आणि भारतालाही इराणची आवश्यकता आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इराणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.