रजत शर्मांनी दिला ‘डीडीसीए’ अध्यक्षपदाचा राजीनामा

rajat sharma

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रजत शर्मा यांनी दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा यांच्याविरोधात दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अर्थात डीडीसीएच्या संचालकांनी ठराव संमत करून त्यांचे अधिकार काढून घेतल्याचे वृत्त आहे. शर्मा यांनी डीडीसीएमधून राजीनामा दिल्याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली.

रजत शर्मा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ‘येथे क्रिकेट प्रशासनात नेहमी ओढाताणीचा आणि दबावाचा अनुभव येत आहे. डीडीसीएमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांसह चालणे शक्य नाही, असे वाटते. अशा बाबींशी मी समझोता करू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘माझ्या कार्यकाळादरम्यान मला अनेकदा विरोधाचा सामना करावा लागला. मला निष्पक्ष आणि पारदर्शकपणे स्वतःचे काम करण्यापासून अनेकदा अडवण्यात आले,’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर काही दिवसांतच शर्मा यांचा राजीनामा आला आहे. गेल्या वर्षी जुलै 2018 मध्ये डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून रजत शर्मा यांची निवड करण्यात आली होती.

Protected Content