मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. यातच अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाऊन पक्षाच्या कामाचा आढावा आणि आगामी विधानसभेची रणनीती आखत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या कामाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्ष संघटनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करत राज्यभरात दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी काही उमेदवारांची देखील घोषणा केली आहे.
यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज २३ सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोडून राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत जवळपास आर्धा तास चर्चा झाली आहे. मात्र, या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? कोणती राजकीय चर्चा झाली? आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? असे अनेक सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.