मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. किमान २२५ ते २५० जागा मनसे लढेल, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षही तयारीला लागला आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.