Home Cities जळगाव सर्व प्रभागांमध्ये क्षेत्रसभा घ्या : अमोल कोल्हे यांची महापौरांकडे मागणी

सर्व प्रभागांमध्ये क्षेत्रसभा घ्या : अमोल कोल्हे यांची महापौरांकडे मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहभागाला बळकटी देण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये क्षेत्र सभा तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर दीपमाला काळे यांना सविस्तर निवेदन सादर केले.

अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारताच्या संविधानातील 74व्या घटनादुरुस्ती (Part IX-A) व 12व्या अनुसूची नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकेंद्रीकरण, पारदर्शकता व लोकसहभाग अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील नियम 29 (क) व शासनाच्या संबंधित अधिसूचनांनुसार महानगरपालिका क्षेत्रात क्षेत्र सभा गठीत करणे आणि त्यांच्या नियमित बैठका घेणे बंधनकारक आहे.

मात्र, जळगाव महानगरपालिकेची स्थापना 2003 मध्ये झाल्यानंतर चार टर्म पूर्ण होऊनही आजतागायत एकही क्षेत्र सभा प्रत्यक्षात घेण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले आहे. या निष्क्रियतेमुळे नागरिकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा व स्थानिक प्रश्नांमध्ये थेट सहभागाची संधी नाकारली गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन 2013 मध्ये याच मुद्द्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी क्षेत्र सभा न घेणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा मुद्दा उपस्थित करून नगरसेवकांची पदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव त्या प्रकरणावर ठोस निर्णय झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सद्यस्थितीत जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात एकूण 75 नगरसेवक असून त्यापैकी सुमारे 70 नगरसेवक हे एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तसेच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती हे देखील त्याच पक्षाशी संबंधित असल्यामुळे निर्णय प्रक्रियेत एकतर्फी बहुमताचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. अशा परिस्थितीत नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करणाऱ्या क्षेत्र सभा या लोकशाही संतुलनासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नवीन टर्म सुरू झाल्याने किमान या कार्यकाळात तरी क्षेत्र सभा नियमितपणे घेण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जळगाव महानगरपालिका क्षेत्रात कायद्यानुसार क्षेत्र सभा तात्काळ गठीत करून सुरू करणे, प्रत्येक प्रभागासाठी क्षेत्र सभांच्या नियमित बैठकींचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करणे, या सभांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रसिद्धी व सूचना प्रणाली राबविणे आणि आजपर्यंत क्षेत्र सभा न घेतल्याबाबत जबाबदारी निश्चित करून सविस्तर अहवाल तयार करणे, अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, निदर्शने व उपोषण करण्यात येईल, असा इशाराही कोल्हे यांनी दिला आहे. तसेच भारताच्या संविधानातील अनुच्छेद 226 अंतर्गत उच्च न्यायालयात रिट याचिका किंवा जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा विषय केवळ प्रशासकीय नसून संविधानिक जबाबदारीशी संबंधित असल्याने महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound