एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यात जवळपास तीन आठवड्यानंतर शनिवारी रात्री पावसाने दमदार कमबॅक केले. त्यामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली असून शेतकरी सुखावला आहे.
एरंडोल तालुक्यात रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे दोन वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. या पावसामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शनिवारी रात्री पडलेल्या पावसाची मंडळ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. उत्राण ६४ (मी.मि.) , कासोदा ६० (मी.मि.), एरंडोल ४४ (मी.मि.) तर रिंगणगावात १३ मी.मि. पाऊस झाला.
मागील जवळपास दोन आठवड्या पासून वरुणराजा रुसून बसला होता. शेवटी संकष्टीला गणरायाने पावसाचे विघ्न दूर केले. गेल्या पंधरा दिवसापासून रोज उन्हाळ्या सारखे चित्र जाणवत होते. इवल्या इवल्या खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजुक झाली होती. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अखेर पावसाचे पुंरागमान झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे. दरम्यान अंजनी धरण व पाझर तलाव भरण्यासाठी व शेत शिवारांमधून पाणी वाहुन निघेल यासाठी मुसळधार पाऊस होणे गरजेचे आहे. अजूनही अंजनी नदी व नालेखोल्यांना एकही पुर न आल्यामुळे ते प्रवाहित झाले नाहीत. तसेच अंजनी धरण तळ गाठलेल्या स्थितीत ‘जैसे थे’ आहे.