नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात महागाईचा आगडोंब उसळून सर्वसामान्यांचे जीवन अडचणीत आलेले असतानाच मोदी सरकार रेल्वे प्रवाशांना मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. रेल्वेतर्फे लवकरच प्रवासी दरात वाढ केली जाणार असून या भाडेवाढीला गेल्याच महिन्यात पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात, तसेच माल वाहतुकीच्या भाड्यात वाढ होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
ही भाडेवाढ तर्कसंगत पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यादव यांनी जाहीर केले आहे. मात्र, ही भाडेवाढ नेमकी किती होईल याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. भाडेवाढ हा संवेदनशील मुद्दा असून याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या विषयावर दीर्घ चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे यादव पुढे म्हणाले. आम्ही भाडेवाढीबाबत ती तर्कसंगत कशी करता येईल यावर काम करत असून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. मी यात फार काही करू शकणार नाही, कारण हा एक अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे. मालावरील भाडे हे पूर्वीपासूनच जास्त आहे. रस्त्यावर होणारी अधिकाधिक मालवाहतूक आम्हाला रेल्वेकडे वळवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.