रेल्वेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक : भुसावळात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल्वेत हेड क्लार्कची नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख चौसष्ट हजार साठ रूपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळात घडला असून या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, वसंत जानबाजी ढोणे ( वय ६६) हे रेल्वे पोलीसात नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. त्यांची एका परिचीत महिलेच्या माध्यमातून प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल ( रा. गडकरी नगर, भुसावळ ) याच्याशी ओळख झाली. यात अग्रवाल याने ढोणे यांचा मुलगा वैभव याला रेल्वेत हेड क्लार्क म्हणून नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवत यासाठी सात लाख रूपये लागतील असे सांगितले. पैसे दिले तर तुमच्या मुलाला नऊ महिन्यात नियुक्तीपत्र मिळणार असल्याचे त्याने सांगितले.

यावर विश्वास ठेवून ढोणे यांनी पहिल्यांदा चार लाख नंतर वेळोवेळी प्रशांत अग्रवाल याला एकूण नऊ लाख चौसष्ट हजार साठ रूपये दिले. यात त्याने एक बनावट नियुक्तीपत्र दिले. यावर स्वाक्षरी व शिक्का नसल्याने ढोणे यांना संशय आला. यावर प्रशांत अग्रवाल याने ते बनावट नियुक्तीपत्र घेऊन लवकरच पक्की ऑर्डर देतो असे सांगितले. मात्र एवढे करून देखील त्याने नियुक्तीपत्र तर दिले नाहीच, पण नंतर तो ढोणे यांचे कॉलही टाळू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसंत जानबाजी ढोणे यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यात प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल ( रा. गडकरी नगर, भुसावळ ) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Protected Content