अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध ‘पिटा ॲक्ट’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी, १ जुलै रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच, त्यांनी तातडीने आपल्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यानुसार, अमळनेर पोलीस पथकाने मंगळवारी, १ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घटनास्थळी डमी ग्राहक (बनावट ग्राहक) पाठवले. या ग्राहकांकडून देह विक्रीसाठी १,००० रुपये घेतले जात होते आणि त्यातील ५०० रुपये पीडित महिलांना दिले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा प्रकार स्पष्ट होताच, पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला.
या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ६१ कंडोमची पाकिटे जप्त केली. तसेच, या ठिकाणाहून देह विक्रीसाठी अडकवून ठेवलेल्या सहा पीडित मुलींची (महिलांची) यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. पीडित महिलांना अडकून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने देह विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या जुमाबाई (पूर्ण नाव अज्ञात), शशिकला मदन बडगुजर (वय ३०) आणि मीना दीपक मिस्तरी (वय ६०) (तिघे रा. गांधलीपुरा, जळगाव) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात ‘पिटा ॲक्ट’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.