नवीदिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत भाजपाच्या महिला खासदारांनी जोरदार गदारोळ घातला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. राहुल गांधी यांनी देशातील सर्व महिलांचा अपमान केला असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य निंदनीय असून त्यांना यासाठी शिक्षा केली जाणार का ? अशी विचारणाही स्मृती इराणी यांनी लोकसभेत केली. यावेळी ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
राहुल गांधी नेमकं काय बोलले ?
झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक सुरु आहे. विधानसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. गुरुवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी झारखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची प्रचारसभा पार पडली. राहुल गांधी यांनी प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींवर टीका केली. “नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली होती. पण आता ‘रेप इन इंडिया’ झाला आहे. भारतात आपण कुठेही पाहिले तर बलात्कार होत असल्याचे दिसत आहे,”.
“झारखंड आणि उत्तर प्रदेशात कुठेही पाहिले तर अत्याचार होताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या पक्षाचा आमदारही तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोपी आहे. इतकंच नाही तर पीडितेला जाळून मारण्यात आल्यानंतरही नरेंद्र मोदी शांत आहेत,” अशी टीका राहुल गांधींनी केली. “नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ, बेटी पढाओ पण कोणापासून वाचवायचे हे सांगितले नाही. नरेंद्र मोदींच्या आमदारापासून मुलींना वाचवायचे आहे,” असा टोला यावेळी राहुल गांधींनी लगावला.
पुढे त्यांनी म्हटले होते की, “भाजपा आणि त्यांचे नेते २४ तास देशात फुट पाडण्याचे काम करत असतात. त्यांचा संपूर्ण दिवस लोकांमध्ये धर्माच्या आधारे भांडण लावण्याचा कट रचण्यात जातो. आणि त्याचवेळी उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांनी देशाचा पैसा देण्याचंही काम करत असतात”.
राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरुन भाजपा नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून संसदेत गदारोळही घातला. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा नेता महिलांवर बलात्कार केला पाहिजे, असे स्पष्टपणे सांगत असल्याचे म्हटले आहे.