सुप्रीम कोर्टाने पी. चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळली ; इडीच्या अटकेचा मार्ग मोकळा

p.chidambaram

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे ईडी आता चिदंबरम यांना चौकशीसाठी अटक करू शकते. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपत आहे.

 

आरोपीला अटक करून चौकशी करणे गरजेचे आहे. जामीन दिल्यानंतर तपासावर परिणाम होऊ शकतो असेत सांगत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळून लावली. तर दूसरीकडे चिदंबरम यांच्या सीबीआय रिमांडचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावर विशेष सीबीआय न्यायालय सुनावणी करणार आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानेही चिदंबरम यांना अटकपूर्वी जामीन देण्यास नकार दिला होता. याव्यतिरिक्त सीबीआयनेदेखील या प्रकरणी चौकशीसाठी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यालाही कनिष्ठ न्यायालयात आव्हान दिले होते. ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली होती. दरम्यान, जामीन देणे हे प्रकरणांवर निर्भर करते. कोणाचा हक्क म्हणून जामीन देता येत नाही. आम्ही ईडीची केस डायरी बघतली असून पैशांच्या लेखाजोख्याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. आरोपीला अटक करून त्याची चौकशी करण्याच्या ईडीच्या दाव्याशी सहमत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

Protected Content