नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे. देशातील २० टक्के गरीब कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. वर्षाला ७२ हजार रुपये गरीब कुटुंबाच्या खात्यात टाकले जातील अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास 25 कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. ‘काँग्रेसने जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,’ अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
आर्थिकदृष्या कमकुवत घटकाला न्याय देणार असल्याचे सांगताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. जर नरेंद्र मोदी देशातील श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, तर काँग्रेस गरिबांना पैसे देऊ शकतं नाही का ? असा सवाल यावेळी राहुल गांधी यांनी विचारला. तर सर्व जाती-धर्माच्या कुटुंबांना या योजनेला लाभ मिळेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना न्याय मिळेल, असे राहुल पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा संदर्भ दिला. गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही तिन्ही राज्यांमध्ये विजयी झालो. त्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली, असे राहुल म्हणाले. आम्ही मनरेगा यशस्वी लागू केली. त्यामुळे किमान उत्पन्न हमी योजनादेखील उत्तमपमे राबवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.