जळगाव प्रतिनिधी । आर.ओ. तात्या पाटील यांच्या प्रकृतीबाबत पसरवण्यात येणार्या अफवा निराधार असून ते लवकरच सक्रीय होणार असल्याचे नमूद करत आमदार किशोर पाटील यांनी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांची नियोजीत सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगतले.
याबाबत वृत्तांत असा की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे १५ फेब्रुवारी रोजी सभा होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, अलीकडेच माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाल्यामुळे ठाकरे यांची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडने सर्वप्रथम दिले होते. यावर आज खुद्द आमदार किशोर पाटील यांनी शिक्कामोर्तब केले.
आज सायंकाळी शहरातील पद्मालय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी आर.ओ. तात्यांच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला असला तरी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ते लवकरच सक्रीय होणार असल्याची माहिती दिली. तात्यांच्या प्रकृतीबाबत मीडिया तसेच सोशल मीडियातून सुरू असणार्या अफवा या निराधार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये. कारण आम्ही सर्व शिवसैनिक सभेसाठी सज्ज असलो तरी स्वत: शिवसेना पक्षप्रमुखांनीच ही सभा पुढे ढकल्याचे निर्देश दिले. यामुळे त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. दरम्यान, त्यांनी युती होवो अथवा न होवो…शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, किशोर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पहा : आमदार किशोर पाटील नेमके काय म्हणालेत ते !