जी.एस. ग्राउंडवर ग्रामीण बचत गटांचे दर्जेदार स्टॉल्स सज्ज ; प्रदर्शन उद्यापासून नागरिकांसाठी खुले 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  दिवाळीचा सण हा उत्सव, रोषणाई आणि भेटवस्तूंचा काळ. अशा या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर “उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान” अंतर्गत ग्रामीण बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलचे भव्य आयोजन जळगाव शहरातील जी.एस. ग्राउंडवर करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ ऑक्टोबर २०२५ पासून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असून, दिवाळी खरेदीला स्थानिकतेची, गुणवत्तेची आणि आत्मनिर्भरतेची जोड देण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, दिवाळी सजावटीची साहित्ये आणि विविध घरगुती उत्पादने या ठिकाणी उपलब्ध असून ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तूंची मेजवानी अनुभवता येणार आहे. दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेले चविष्ट लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे, फरसाण यासारखे पारंपरिक पदार्थ येथे मिळणार आहेत. यासोबतच गाईच्या शेणापासून बनवलेले नैसर्गिक धूप, अगरबत्ती, पंचगव्य प्रोडक्ट्स, पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू जसे की आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, तोरण, पूजा थाळी, मोत्यांचे वर्क, शोभेच्या वस्तूंचीही रेलचेल आहे.

खास उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामीण महिलांनी तयार केलेले हेल्दी मल्टी मिलेट्स पदार्थ, बटाटा-केळी वेफर्स, आंघोळीचे साबण, उटणे, लाकडी खेळणी, गावरान तूप, मसाले, खोबऱ्याचे लाडू, नानखटाई आणि पुरणपोळी यांसारखे पारंपरिक चवदार खाद्यपदार्थ येथे थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही उत्पादने केवळ घरगुती चव आणि गुणवत्ता जपत नाहीत, तर स्वयंपूर्णतेचे प्रतीकही ठरतात.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासीयांना आवाहन केले की, “उमेदच्या बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करून एक सुखी, समृद्ध आणि आत्मनिर्भर दिवाळी साजरी करावी.” जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनीही सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांनी या स्टॉलमधून खरेदी करून ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेस हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.