अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा; रिपाइंचे एसपींना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करत तिचा दगडाने खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना निवेदन दिले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय चिमुकली ही आपल्या घरी एकटी असताना संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) याने तिला घरी बोलवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत दगडाने ठेचून निर्घृण खून केला. या घटनेचा जळगाव जिल्ह्यासह राज्यात तीव्र पडसाद उमटत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून दुदैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.  संशयित आरोपीवरील दाखल गुन्ह्याचा खटला जलद न्यायालयात चालवून ६ महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून असे कृत्य समाजात भविष्यात कोणी करणार नाही तसेच पीडित कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या वतीने शुक्रवार  ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन दिले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शारदा अडकमोल, सुरेखा अटकाळे, भाग्यश्री पारधे, प्रभाबाई ठाकूर, कमल मोरे, रंजना पारधे, रमाबाई निकम, विमल सपकाळे, विजया सुपलकर, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, अनिल लोंढे, गौतम सरदार यांच्यासह पक्षाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content