उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्य कर्तव्य — डॉ. धर्मेंद्र पाटील

जळगाव,प्रतिनिधी | सहानुभूतीने मानसिक अपंगत्व अप्रत्यक्ष देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्यकर्तव्य झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ .धर्मेंद्र पाटील यांनी केले.

 

भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अपंग दिनानिमित्त शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या हृद्य सत्कार प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी मातोश्री आनंदाश्रमाचे प्रकल्प सहप्रमुख संजय काळे, शामकांत जोशी, हरीभाऊ मांडवगडे, उषा भागवत उपस्थित होते. सदरहू कार्यक्रम केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री आनंदाश्रम सावखेडा बुद्रुक येथे अविनाश आचार्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, कवी शशिकांत हिंगोणेकर, भुतपूर्व आनंदाश्रमाचे प्रकल्प सहप्रमुख उमेश जोगी, हेमंत पाटील, जयश्री पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रथम स्रत्रात जागतिक अपंग दिनानिमित्त नृत्यांगना मानसी पाटील हीचा नेत्रतज्ञ तथा आर्या फाऊंडेशनचे समाजसेवी अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. कलाम पुस्तक भिशीतर्फे सभासदांच्या सहकार्याने रोख पाच हजारांचे आर्थिक सहकार्य शिक्षणासाठी देण्यात आले त्याचवेळी शाल तसेच ” मनोबल तिमिराकडून तेजाकडे ” हे यजुर्वेंद्र महाजन संपादित प्रेरणादायी पुस्तक देऊन मानसीचा हृद्य सत्कार करण्यात आला.

निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाईंच्या कविता संग्रहाचे ग्रंथपुजन करण्यात आले. सत्कारार्थी मानसी पाटील हीची अपघातानंतरची संघर्षगाथा व कलासाधनेचा परिचय पुस्तक भिशीचे संस्थापक तथा जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी करून दिला.
सत्कारार्थी नृत्यांगना मानसी पाटील हीने तु ही ss रे ( सलाम बॉम्बे ) व जादूकी झप्पी ( रमैय्या वतावैय्या ) या गाण्यांवर रेकॉर्ड डान्स सादर केले .केवळ एका डाव्या पायावर तोल सांभाळत चपळतापूर्ण नेत्रसुखद पदलालित्य व गाण्यांच्या आशयानुसार मानसीचे सात्विक हावभाव यामुळे बाबाआजी मंत्रमुग्ध झाले. नृत्य संपताच भारावलेल्या बाबाआजींनी मानसीला प्रत्यक्ष आशिर्वाद देऊन अक्षरशः गोंजारत बक्षिस देण्यासाठी झुंबड करीत प्रेमाने हितगुज केले !!
नाना बागुल , सिताराम पाटील , हुनाजी तळेले ,शामकांत जोशी , हरिभाऊ मांडवगडे , दिनकर जोशी , विजया पोतदार , मल्हांबाई कुमावत , श्रीमती सोनार , आशा क्षिरसागर , निर्मला कुलकर्णी , शांताबाई चौधरी या संवेदनशील कलाप्रेमी बाबाआजींनी अवघ्या १० मिनिटात मानसी पाटील  हिला आशीर्वाद स्वरुपात आर्थिक मदत केली. यावेळी निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कवी विजय लुल्हे यांनी बहिणाबाईंच्या दोन कवितांचे वाचन केले. बहिणाबाई चौधरींच्या कवितेंची पुस्तके विजय लुल्हे यांनी स्व .पिताश्री सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काव्यरसिक बाबाआजी वाचकांना सादर सस्नेह भेट दिली .
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी चमत्कार सादर करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत प्रबोधन केले. मातोश्री आनंदश्रमाच्या मातृपितृतूल्य बाबाआजींना पुस्तक भिशीतर्फे उत्तर दिवाळी फराळ देऊन कार्यक्रमाचाअनौपचारीक समारोप झाला. सूत्रसंचालन संयोजक विजय लुल्हे व आभार डिगंबर कट्यारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आर्थिक योगदान निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर व अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, अभियंता मिलिंद काळे व संजय भावसार, दिगंबर कट्यारे, विजय लुल्हे , उषा सोनार, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील सर ,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले सर , ह .भ .प .मनोहर खोंडे ,पत्रकार दिपक महाले यांचे मिळाले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कलाशिक्षक सुनिल दाभाडे,आश्रमाचे व्यवस्थापक पवन येपुरे, मदतनीस नवल पाटील, रुपेश भोई यांनी सहकार्य केले .

Protected Content