‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या ‘वाटा शिक्षणाच्या’ पुरवणीचे प्रकाशन; विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शनाचा विश्वास


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बदलत्या काळाची पाऊले ओळखून डिजिटल मिडीयाशी सुसंगत होत भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या न्यूज पोर्टलने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षणाची संधी व उपलब्ध वाटा या विषयावर ‘वाटा शिक्षणाच्या’ या आशयावर काढलेली शैक्षणिक पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक यांनी व्यक्त केला. शहरातील पु. ओं. नाहाटा महाविद्यालयाच्या संगणक हॉलमध्ये गुरुवारी (२९ मे) ‘वाटा शिक्षणाच्या’ या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन:
या कार्यक्रमाला भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील, जळगावातील लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील, भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

महेशभाऊ फालक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ असे सांगत ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी निश्चितपणे दिशादर्शक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी पत्रकारीतेचा इतिहास उलगडून दाखवत गणेश वाघ यांच्या कार्याचे कौतुक केले. शेखर पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात डिजिटल मीडिया विकसित झाला असला तरी तो भुसावळातून सर्वाधिक विकसित झाल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या काळानुसार पत्रकारांनी अपडेट होणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याची आज गरज असल्याचे ते म्हणाले.

डॉ. केतकी पाटील यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल असे सांगत, आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राविषयी अधिक उहापोह करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रजनी सावकारे यांनी मुलांना आणि पालकांनाही मार्गदर्शन गरजेचे असल्याचे नमूद केले. आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) संकल्पनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचे आवाहन केले आणि ऑनलाइन व ऑफलाइन पदवी मिळवण्याच्या संधींवर प्रकाश टाकला.

यावेळी द वर्ल्ड स्कूलचे संचालक व सी.ए. रोहित कोलते, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी. फालक, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, शिक्षण तज्ज्ञ प्र. ह. दलाल, वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे, अ‍ड. निर्मल दायमा, चेतन जैन, मयूर अंजाळेकर आदी जाहिरातदार आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यावरण तज्ज्ञ नाना पाटील यांनी केले, तर आभार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी मानले. उपस्थित मान्यवरांचा बुकेऐवजी आवळा व जास्वंदीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला, यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.