पाचोऱ्यात परभणी घटनेचा जाहीर निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधान विरोधी घोषणाबाजी या कृतीचा जाहीर निषेध करत पाचोरा येथील आंबेडकरी समाज बांधव व भगिनी यांनी संबंधित इसमानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई, ज्योतिराव फुले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून प्रांताधिकारी भुषण अहिरे, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना निवेदन सादर केले.

परभणी शहरात मंगळवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टँड रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका समाज कंटकाने मोडतोड करुन संविधान विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यतः शहरात प्रशासकीय व मुख्य चौक परिसरात अशा पद्धतीने घटना घडते व तेही भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वातंत्र्यात आहोत काय ? हा खरा प्रश्न उभा राहतो. सध्या शहराशहरात जे मोर्चे निघत आहे त्यामुळे कुठेतरी समाज बांधवांच्या मनात तेढ निर्माण तर होत नाही ना ? हे देखील तपासणी गरजेचे झाले आहे. त्यामुळे सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी, पोलिस प्रशासन व तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

Protected Content