ज्वारी, मका व गहूची शेतकी संघामार्फत खरेदी करा : भाजपाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकी संघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी सुरु करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे खासदार उन्मेष पाटील व पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

मागील गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील शेतकीसंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका व गहू खरेदी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातून ज्वारीसाठी ९१६ मकासाठी ७०० व गहू साठी ०५ शेतकऱ्यांनी तसेच भडगाव तालुक्यातून ज्वारीसाठी १ हजार ६२, मकासाठी ५६०, गहूसाठी १२ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. प्रत्यक्षात खरेदीसाठी आज पावेतो सुरुवात झालेली नाहीये.  त्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम जवळ आला असून त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते. मात्र शासनस्तरावरून खरेदी संदर्भात कुठलाही आदेश न आल्याने सदर शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही. अशा पद्धतीने या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीत या सरकारने शेतकरी बांधवांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे  असे यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.  जिल्हयातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू खरेदी त्वरित  होण्यासाठी खासदार पाटील यांनी  वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात जी. आर. काढण्यास पाठपुरावा करू असे देखील सांगितले.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी मका व गहू त्वरित खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच वरील नोंदणीकृत शेतकऱ्यांन व्यतिरिक्त पाचोरा तालुक्यातून अजून जवळपास ४०० व भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केला असून त्याची ऑनलाइनची मुदत संपल्याने शेतकीसंघाकडून सदर ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. तरी ऑनलाईनची प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून उर्वरित शेतकऱ्यांची देखील नावनोंदणी करून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली. याप्रसंगी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस व जि. प. सदस्य मधुकर काटे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते.

 

Protected Content