जळगावात मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या विरूध्द सर्वोच्च न्यायालयात बुट फेकण्याची खेदजनक घटना घडली आहे. या प्रवृत्तीचा तिव्र शब्दात जळगाव जिल्हा वकील संघाने आज गुरुवारी ( ९ ऑक्टोबर) रोजी निषेध नोंदविला. यात जिल्हा वकील संघाने न्यायालयात सकाळच्या सत्रातील कामकाज बंद ठेवून दुपारी जळगाव न्यायालयात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या विरुध्द सर्वोच्च न्यायालयात बुट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची खेदजनक घटना घडली आहे. या घटनेचा जळगाव वकिल संघातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वायत्ता हा लोकशाहीच्या मुलभुत आधारस्तंभापैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र संस्थेत अशा प्रकारचे असभ्य आणि अमानवी कृत्य कोणत्याही परिस्थीतीत ग्राह्य धरता येणार नाही. न्याय व्यवस्थेवर अशा प्रकारे अपमानास्पद वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्या वृत्तीचा जळगाव जिल्हा वकील संघाने प्रखर निषेध केला. तसेच अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात जळगांव जिल्हा वकील संघाचे सचिव विरेंद्र पाटील, उपाध्यक्ष स्मिता झाल्टे तसेच माजी सरकारी वकील अॅड. राजेश गवई, अॅड. संजयसिंग पाटील, अॅड. सुरूवाडे , अॅड. कमलाकर शिरसाठ यांनी आपल्या शब्दाद्वारे तिव्र निषेध व्यक्त केला. तसेच या प्रसंगी अॅड. दिपक सोनवणे, अॅड. दिपक शिरसाठ, अॅड. बारी, अॅड. दिपकराज खडके, अॅड. अभिजीत रंधे, अॅड. निलेश जाधव, अॅड. अविनाश पाटील, अॅड. महेश दंडगव्हाळ व इतर वकील बंधू आणि भगीनी उपस्थित होते.