
फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये समाविष्ट असलेल्या हजारो मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक १ मध्ये जोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेख कुर्बान शेख करीम या रहिवाशाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
शेख कुर्बान यांनी दाखल केलेल्या अर्जात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, प्रभाग क्रमांक १० मधील कळमोदा रोड, तडवी वाडा, इस्लामपुरा, यावल रोडवरील दर्गा जवळील भाग आणि आराधना कॉलनी (जुना आमोदा रोड) हे सर्व क्षेत्र नवीन हद्दवाढीनुसार प्रभाग १० मध्ये असले पाहिजे. मात्र, सध्याच्या मतदार यादीत या भागांतील सुमारे दोन हजार मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक १ मध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे प्रभाग १० मध्ये केवळ १३३९ मतदारांची नोंद आहे, जी प्रत्यक्षात असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय अपुरी आहे.
यामुळे मतदारांची प्रतिनिधित्वाची संधी धोक्यात आली असून, हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सदर त्रुटीमुळे प्रभाग १० मध्ये राहणाऱ्या मतदारांचा त्यांच्या स्वतःच्या भागातील निवडणुकीत सहभाग नाकारला जात आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.
शेख कुर्बान शेख करीम यांनी आपल्या अर्जात निवडणूक यंत्रणेला संबोधित करत स्पष्ट मागणी केली आहे की, सदर घोळ तात्काळ दूर करून प्रभाग क्रमांक १० ची मतदार यादी नव्याने पुनर्रचित करावी व वरील नमूद भागांतील सर्व मतदारांची नावे योग्य प्रभागात समाविष्ट करावीत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
फैजपूर नगरपरिषदेतील प्रभाग रचनेतील अशा त्रुटी जर वेळेत दुरुस्त झाल्या नाहीत, तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारीची तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.



