Home Cities अमळनेर शेत रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या घरकुलांचे बांधकाम थांबवण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

शेत रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या घरकुलांचे बांधकाम थांबवण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

0
147


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील जवखेडा गावात शेतामध्ये जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर घरकुलांची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित बांधकाम थांबवण्याचे आदेश गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांना दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन घरकुलांचे बांधकाम सुरू होते. ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामसभेत यावर आक्षेप घेतला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गावातील सुनील पाटील, नीलकंठ पाटील, मालतीबाई पाटील, चंद्रभान पाटील, रवींद्र पाटील, अशोक पाटील, युवराज पाटील, विजय पाटील, प्रफुल्ल पाटील, अनिता बोरसे, सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, आखाडू भिल, वासुदेव पाटील, सुनीता पाटील आणि दुर्गेश पाटील यांनी एकत्र येऊन शिष्टमंडळाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाने रस्त्यावर घरकुले बांधल्यास शेतकऱ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होईल व शेतीच्या कामांवर परिणाम होईल, असे सविस्तर सांगितले. त्यानंतर प्रांताधिकारी मुंडावरे यांनी तातडीने गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देत, संबंधित घरकुलांचे बांधकाम त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले. गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांनी देखील ग्रामसेवकाला तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound