जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरात राहणाऱ्या नागरीकांना तात्काळ घरकुल किंवा पर्यायी जागा देण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तांबापूरा परिसरातील महादेव मंदीर ते शिरसोली नाका परिसरात गेल्या ५० वर्षांपासून तेथील नागरीक वास्तव्याला आहे. नियमाप्रमाणे महापालिकेस घरपट्टी व पाणीपट्टी कर भरत आहे. येथील सर्व नागरीक हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी परिसरात येवून रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली जेसीबीच्या मदतीने घरे तोडण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरीकांना राहण्याची जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महादेव मंदीर ते शिरसोली नाक्यापर्यंतच्या नागरीकांना घरकुल किंवा पर्यायी जागा देण्यात यावी. येत्या दोन दिवसात पर्यायी जागा मिळाली नाही तर गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव वैभव शिरतूरे, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, महानगरप्रमुख दिपक राठोड, महानगर सचिव डॉ. नारायण अटकोरे, महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल, जितेंद्र केदारे, गमीर शेख, संजय शिंदे, प्रविण इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.