अंत्यसंस्काराचा खर्च उचलण्यापेक्षा तालुक्यात आरोग्य सुविधा पुरवा- राष्ट्रवादी नेते संजय गरूड

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीष महाजन यांनी कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलण्यापेक्ष तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठीचा खर्च उचलावा असा खोचक सल्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी दिला. 

आमदार गिरीष महाजन यांनी जामनेरातील रक्तदान शिबीरात पत्रकारांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती, तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा अंतीमसंस्कार खर्च जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात येणार असल्याची घोषणाही केली होती त्या घोषणेनंतर समाज माध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, त्याच घोषणेचा समाचार घेतांना तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुड यांनी खोचक सल्ला देतांना आ.गिरीश महाजनांनी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंतीम संस्काराचा खर्च उचलण्यापेक्षा तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठीचा खर्च उचलावा असा सल्ला दिला आहे.

जामनेर तालुक्यातील जनतेने आमदार गिरीश महाजन यांना २२ वर्ष आमदारकी व साडेचार वर्ष मंत्रिपद व जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देऊन त्यांच्यावर अनंत उपकार केले आहेत. सात जन्म घेऊनही ते तालुक्यातील जनतेचे उपकार फेडू शकणार नाहीत. कोरोना सारख्या महामारीच्या काळात इतर तालुक्यातील आमदार जंबो कोविड सेंटरची  उभारणी करून कोरोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हर इंजेक्शन इत्यादी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आमदार गिरीश महाजन तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून गेल्या १५ दिवसांपासून कुठे गायब होते याचं उत्तर जनतेला मिळणे अपेक्षित आहे. ज्या जनतेने निवडून दिले, त्या जनतेचा जीव वाचविणे महत्वाचे की एखाद्या राज्यातील निवडून महत्वाची हेही त्यांनी आधी जाहीर करावे. राज्यांचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच प्रत्येक आमदाराला आपापल्या तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयात सोयीसुविधा उभारण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच स्थानिक आमदार निधीतूनही निधी उपलब्ध आहे, त्या निधीतून जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादी सुविधा निर्माण करता येतील ज्यामुळे नागरिकांचा जीव वाचेल त्यासाठी प्रयत्न करावा. आमदारांनी एक वर्षांपूर्वी जामनेर येथे मोठा गाजावाजा करत जीएम हॉस्पिटलची उभारणी करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटनही केले आहे. त्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन जळगावच्या खाजगी हॉस्पिटलकडे आहे. 

तेथे रोख पैसे भरल्याशिवाय गोरगरिबांना सेवा मिळत नाही, आपण वर्षानुवर्षे आरोग्य सेवेचा डांगोरा पिटत असतांना स्वतःच उभारलेले हॉस्पिटल सहा महिनेही का चालवू शकले नाही आमदार महोदयांनी  उठसुठ राज्य सरकार कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात १००% अपयशी ठरल्याचा आरोप करू नये कारण आपणही २७ वर्ष आमदार , ५ वर्षी मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवुन आहेत तालुक्यातील व जिल्ह्यातील एकंदर आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आपण काय प्रयत्न केले आजच्या परिस्थितीस माजी मंत्री म्हणून आपण जबाबदार नाहीत का की आपले अपयश झाकण्यासाठी सरकार वर आरोप करता असा प्रश्न जनतेला पडला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलण्याची घोषणाबाजी करून व्यक्ती गमावलेल्या आप्तांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळू नका व दुख्खी जणांना अधिक दुःख देऊ नका,आपणास खरोखरच जनतेची सेवा करायची असेल तर तालुक्यातील आरोग्य सुविधा जलद गतीने सुधारून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करा असे भावनिक आवाहनही संजय गरुड यांनी केले आहे.

Protected Content