जिल्ह्यात ४२९ जण कोरोनामुक्त; ३६५ रूग्णांवर उपचार !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात आजवर ४२९ आबालवृध्द कोरोनामुक्त झाले असून ३६५ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि विशेष करून मृत्यूचे जास्त प्रमाण ही बाब अतिशय चिंताजनक मानली जात आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा दर हा देशात सर्वाधीक असल्याचेही आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या देखील वाढत असल्याचेही कुणी नाकारणार नाही. यातच जिल्हा प्रशासाने रात्री जाहीर केलेल्या प्रेस नोटमधून एक सकारात्मक पैलू समोर आला आहे.

या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात आजवर ९०७ कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले असून यातील ११३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आजवर ४२९ आबालवृध्द कोरोनामुक्त झाले असून ३६५ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही उपचार सुरू असणार्‍यांपेक्षा जास्त असल्याचा एक सकारात्मक पैलू यातून समोर आला आहे. तसेच, उपचार सुरू असणार्‍यांमध्ये ३२५ रूग्णांची प्रकृती स्थिर असून ४० जण अत्यवस्थ आहेत. यामुळे यातील बहुतांश रूग्ण हे बरे होऊ शकतील असे स्पष्ट संकेत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता रिपोर्ट बाकी असणारे ६२४ स्वॅब सँपल्स उरले असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

Protected Content